स्विस न्यायालयाने हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना त्यांच्या जिनिव्हा व्हिलामध्ये घरगुती कामगारांचे शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी साडेचार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या या व्हिलामध्ये अनेक निरक्षर भारतीय कामावर होते. स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना कामगारांचे शोषण आणि बेकायदा रोजगार दिल्याप्रकरणी दोषी ठरवले.
अनेक दशकांपासून स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदुजा कुटुंबावर कामगारांचे पासपोर्ट जप्त करणे, त्यांना स्विस फ्रँक्स ऐवजी रूपयांमध्ये वेतन देणे, त्यांच्या आहार-विहारावर मर्यादा घालणे आणि तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जास्त तास काम करण्यास भाग पाडणे असे आरोप होते. प्रकाश हिंदुजा यांच्यावर यापूर्वी 2007 मध्येही असा आरोप झाला होता.
स्विस अधिकाऱ्यांनी हिंदुजा कुटुंबियांचे हिरे, माणिक आणि प्लॅटिनम नेकलेससह विविध मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याचा वापर कायदेशीर शुल्क आणि संभाव्य दंड भरण्यासाठी केला जाऊ शकतो. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार स्वयंपाकी आणि घरातील मदतनीसांसह कर्मचाऱ्यांना काहीवेळा दिवसात 18 तास काम करण्यास भाग पाडले जाते. त्यांना सुटीही दिली जात नाही. तसेच स्विस कायद्यानुसार आवश्यक असलेल्या रकमेच्या एक दशांशपेक्षा कमी रक्कम वेतन म्हणून देण्यात येते. तसेच त्यांचे वेतन रुपयांमध्ये देण्यात येते. काही कर्मचारी व्हिलाच्या तळघरात, कधीकधी मजल्यावरच झापोतात. त्यांच्या खानपानाची आणि निवासाची व्यवस्था नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
काही कर्मचारी केवळ हिंदी बोलत होते आणि त्यांना त्यांच्या घरी परतल्या बँकांमध्ये भारतीय रुपयात वेतन दिले जात होते. त्यामुळे त्यांच्याकडे खर्चासाठी पैसे नव्हते. तसेच पासपोर्ट जप्त केल्याने ते परतूही शकत नव्हते. मालकांच्या परवानगीशिवाय त्यांना बाहेर जाण्यास मनाई होती. एकप्रकारे त्यांचे स्वातंत्र्य हिरावण्यात आले होते. हिंदुजा कुटुंबियांनी या कामगारांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याएवजी पाळीव कुत्र्यावर जास्त खर्च केला, असेही आरोपात नमूद करण्यात आले आहे. या भारतीय कर्मचाऱ्यांची कथित तस्करी आणि शोषणासंबंधीच्या खटल्यादरम्यान ही माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणी हिंदुजा कुटुंबियांना साडचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.