कोणत्याही ब्रॅण्डचे नकली बूट किंवा कपडे घालून अमेरिकेच्या एअरपोर्टवर जाणाऱयांचे काही खरे नाही. युएस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) नियमांनुसार प्युमा, अॅडीडास किंवा नाईके यासारख्या मोठय़ा ब्रॅण्डच्या नकली वस्तू अमेरिकेचे कस्टम अधिकारी जप्त करतात. एवढेच नव्हे तर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
अमेरिकेच्या कस्टम अधिकाऱयांनी डुप्लिकेट मालाच्या तस्करीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. यामुळेच अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकेत जाणाऱया अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी आणि प्रवाशांचे महागडय़ा आणि लक्झरी वस्तू जप्त झाल्या आहेत. जर एखाद्या ब्रँडच्या डुप्लिकेट वस्तू घेऊन तुम्ही अमेरिकेच्या एअरपोर्टला पोचलात तर त्या वस्तू तिथल्या तिथे कचरापेटीत फेकून दिल्या जातात.
सी. बी. पी. नियमानुसार, तुम्ही कोणतीही एक नकली वस्तू उदाहरणार्थ शर्ट, हॅण्डबॅग, बूट घेऊन जाऊ शकता. पण अट अशी आहे की ती वस्तू तुमच्या स्वतःच्या वापरासाठी हवी. कुणाला विकण्यासाठी किंवा व्यावसायिक हेतूने नसावी.
n झारखंडच्या जमशेदपूर येथील शिक्षक अमेरिकेत आपल्या मुलाकडे गेले होते. त्यांच्याकडे आठ शर्ट, चार पँट, बूट- मोजे होते. त्यांची चौकशी केली. हे सामान कुणासाठी आणलंय, स्मगलिंगचे आहे का, असा प्रश्नांचा भडिमार केला. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्या 30 हजारांच्या वस्तू जप्त केल्या.
n हैदराबादच्या 27 वर्षीय मुलाने सांगितले की आपल्या देशात मोठय़ा ब्रँडच्या डुप्लिकेट वस्तुंची खरेदी विक्री सर्रास होते. मात्र अमेरिकेत हा मोठा गुन्हा समजला जातो, हे माहीत नव्हते, असे सांगितले. तर दुसऱया विद्यार्थ्याचे 10 शर्ट, तीन जोडी बूट कचरापेटीत फेकण्यात आले.