पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘अटल सेतू’ पुलाला भेगा, हायकोर्टाने चौकशी करावी; नाना पटोलेंची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या ‘अटल सेतू’ पुलाला भेगा पडल्या आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. नुकत्याच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या पुलाला भेगा पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या पुलाला भएगा पडलेल्या ठिकाणाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाहणी केली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

या पुलाची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पुलाला भेगा पडल्याचे फोटो अपलोड केले आहेत. तसेच या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पोस्टमध्ये पटोले यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या “अटल सेतू” पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. यावेळी समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री. मदन जाधव, सचिव श्री. रमाकांत म्हात्रे, श्री. रामविजय बुरुंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

नुकत्याच उद्घाटन झालेल्या पुलाला भेगा कशा पडल्या, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या पुलावरून प्रवास करणाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.