केळशी गावात शेतकऱ्यांना वानरांचा त्रास होताच त्यात आता रानडुक्करांच्या त्रासाची भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवासीही त्रस्त झाले आहेत. मात्र वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटींव्दारे सांगूनही वनविभाग मात्र माकडे आणि रानडुक्करांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काहीच उपाय योजना करत नसल्याने वन्य प्राण्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
केळशी गावाच्या आसपासच्या गावांमधील जंगलांची प्लॉटिंग विकसित करण्याच्या नावाने बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत. परिणामी वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलात राहणारे वन्य प्राणी केळशी गावातील निवासी भागात शिरतात. केळशी हे आंबा,नारळ, सुपारी, केळींच्या बागा, भातशेती, कडवा, वाल, चवळी, कुळीथ आदी पिकांचे गाव आहे. केळशी गावाच्या सरहद्दीतून वाहणाऱ्या भारजा नदीच्या खाडीलगत खाजण आहे. या घनदाट खाजणाच्या ठिकाणी फारसे कोणी फिरकत नसल्याने वन्य प्राण्यांना ते ठिकाण सुरक्षित वाटते. त्यामुळे रानडुक्करांनी गेल्या काही वर्षात या ठिकाणी बस्तान बसविले आहे. रानडुक्करे खाण्याच्या शोधात भाताच्या शेतीची नासधुस करत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीला धोका वाढला आहे.
केळशी या बागायती गावात विविध प्रकारची फळझाडांची लागवड आहे. या फळबागांतील फळांची नासधुस वानरे करतात. आता त्यात रानडुक्करांच्या कळपांच्या झुंडीचा वावर भातशेतीची नासधूस करत आहे. याबाबत दापोली परिक्षेत्र वन अधिकारी, तालूका वन अधिकारी यांना या त्रासाची अनेकदा लेखी पत्रांव्दारे माहिती दिली आहे. केळशीत उपाय योजनांसाठी वन विभागाकडून शेतकऱ्यांची सभा घेतली. मात्र, परिस्थिती बदलली नाही. आता वन विभागानेच पुढाकार घेत रानडुक्करे तसेच केलटी, वानराच्या त्रासातून केळशी येथील शेतकऱ्यांनी मुक्तता करावी, अशाप्रकारची मागणी शेतकऱ्यांसह स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.