कोपरगावमधील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोपरगाव शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर प्रशासनाने धडक कारवाई करत अखेर ते जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे ही कारवाई पालिका व पोलीस कर्मचाऱयांच्या अधिपत्याखाली झाली आहे.

कोपरगावातील अवैध कत्तलखाने हटवा; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा कालच (दि. 19) सकल हिंदू संघटनांनी दिला होता. यानंतर अवघ्या 24 तासांत ही कारवाई करण्यात आली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी शहरातील सर्व अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत आयशा कॉलनी आणि संजयनगर भागातील अनेक कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले. शहरातील संजयनगर आणि आयशा कॉलनी परिसरातील बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा सकल हिंदू समाजाच्या मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना दिला होता. या निवेदनाची नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत संयुक्तपणे मोहीम राबवत कत्तलखान्याची दोन बांधकामे जमीनदोस्त केली.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागप्रमुख अश्विनी पिंगळ, किरण जोशी, सुनील आरण यांच्यासह बांधकाम व सफाई विभागाच्या 15 ते 20 कर्मचाऱयांनी कारवाईत भाग घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.