ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी मिंधे सरकारने दाखवली असून शुक्रवारी सरकारचे शिष्टमंडळ वडिगोद्रीत येणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी पह्नवरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच ही माहिती दिली.
मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींचे नुकसान होणार नाही याची लेखी हमी द्यावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला असून कालपासून दोघांचीही प्रकृती अत्यंत खालावली आहे. उपोषणाच्या दुसऱया दिवशी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार संदिपान भुमरे हे सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी आले होते. परंतु लेखी हमीचा विषय निघताच या तिघांनी तेथून काढता पाय घेतला. तेव्हापासून या उपोषणाकडे सरकारकडून कोणीही आले नाही.
ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे प्रकाश आंबेडकर यांचे मत
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आज प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचे असेल तर त्याची वेगळी तरतूद सरकारने केली पाहिजे असेही ते म्हणाले. आंबेडकर यांच्या विनंतीवरून प्रा.हाके आणि वाघमारे यांनी थोडे पाणी घेतले.