आता परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार का? असा सवाल करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी परीक्षा गोंधळावर ‘एक्स’च्या माध्यमातून निशाणा साधला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 18 जूनला घेतलेल्या नेट-यूजीसी परीक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ ‘नीट’च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची ‘कातडी बचाव’ हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचे नुकसानच झाले. नऊ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि या परीक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. शिवाय मनस्ताप झाला तो वेगळाच. आता त्यांना पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ करणाऱयांना घोळ घातल्याशिवाय देशभरात कुठलीही परीक्षा घेताच येत नाही. युवकांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल करणाऱया या केंद्र सरकारने दिखाऊपणा बंद करून खरे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणे बंद करावे, असे ठणकावतानाच आता या परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करतील का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला.