लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बिथरलेल्या भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाने आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत कुरघोडय़ा सुरू केल्या आहेत. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतही राजकीय हस्तक्षेप आणून शिवसेनेच्या सुमारे 12 हजार मतदारांची नावेच मतदार यादीतून ठरवून बाद केली गेली असा गंभीर आरोप शिवसेना नेते व मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अॅड. अनिल परब यांनी आज केला. त्यासंदर्भातील पुरावेच त्यांनी माध्यमांसमोर ठेवले.
अनिल परब यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख संतोष शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, पण ती सत्ताधाऱयांच्या दावणीला बांधलीय का, असा आरोप करतानाच पदवीधर निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी घरोघर जाऊन नोंदवलेली अनेक मतदारांची नावे पुरवणी मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक समाविष्टच करण्यात आलेली नाहीत, असे परब यांनी सांगितले. शिवसैनिकांनी भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि मिंधे गटाने नोंदवलेली सर्व नावे मतदार यादीमध्ये आली, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
मतदार अर्ज भरल्यानंतर तो तपासला जातो आणि पूर्ण असेल तरच स्वीकृत केला जातो. त्यानंतर पोच म्हणून स्लीप दिली जाते. रद्द केला गेला तर तिथल्या तिथे कारण सांगितले जाते. ऑनलाइन अर्ज भरला तरी तो परिपूर्ण असेल तरच तो स्वीकारला जातो. शिवसेनेने नोंदवलेल्या हजारो मतदारांना अशी पोच मिळूनही त्यांची नावे का गाळली गेली ते आम्हाला कळायलाच हवे. खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घ्यायला गेलो होतो; परंतु ते कार्यालयात नसल्याने तिथे उपस्थित सहमुख्य अधिकारी कुळकर्णी व जिल्हाधिकाऱयांना यासंदर्भात तक्रार दिली, असे परब यांनी सांगितले. मतदार यादीत समाविष्ट न केलेल्या नावांची छाननी करून ती त्वरित मतदार यादीत सामील करावीत, अशी विनंतीही करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर कार्यवाही न झाल्यास शिवसेनेची काय भूमिका राहणार, असा सवाल यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर कारवाई न झाल्यास निवडणुकीनंतर न्यायालयात जाणार असल्याचे अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
वांद्रय़ाच्या मतदाराचे मतदान मुलुंडला
निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक पाच ते दहा अर्ज पाठवत होता. तीच नावे हेरून ती रद्द केली गेली आहेत असे सांगतानाच, शिवसेनेला मतदान होऊ नये म्हणूनही कारस्थान केले गेल्याचे अनिल परब म्हणाले. वांद्रय़ाला राहणाऱया मतदाराला विक्रोळी आणि मुलुंडला मतदान पेंद्र देण्यात आले आहे. एकाच पत्त्यावर राहणाऱया पती-पत्नीचेही मतदान वेगवेगळय़ा ठिकाणी आहे. ही प्रक्रियेतील चूक आहे की जाणीवपूर्वक केले गेलेले कृत्य आहे याचा तपास व्हायला हवा, अशी मागणीही अॅड. अनिल परब यांनी केली.
पोस्टल मतदानाची व्यवस्था करा
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारीही शिवसेनेचे मतदार असल्याचे पाहूनच नियुक्त केले गेले असून त्यांच्या मतदानाची काय सोय केली हेसुद्धा निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे आणि त्यांना पोस्टल मतदानाची व्यवस्था करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. मतदानासाठी खासगी आस्थापनांतील पदवीधर कर्मचाऱ्यांना दोन तासांची सुट्टी देण्याचे निर्देश जारी करावेत, असेही मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना दिलेल्या पत्रात परब यांनी नमूद केले आहे.