मुंबईकरांना दिलासा; तूर्तास आणखी पाणीकपात नाही

मुंबईत पावसाचे वेळेवर आगमन झाले, मात्र एकदोन आठवडे तो तरी तो बरसलाच नाही. त्यामुळे आधीच 10 टक्के पाणीकपात असलेल्या मुंबईची चिंता वाढली आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमध्ये आता केवळ 5.32 शिल्लक राहिला आहे. मात्र जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे तूर्तास आणखी पाणीकपात केली जाणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली 

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 43 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते, मात्र धरणांतील पाणीसाठय़ात घट झाल्याने 5 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. रोज पाणीपुरवठा होतो त्यापैकी 10 टक्के पाण्याची बचत होत असल्याने रोज 400 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने राज्य सरकारने दोन लाख 28 हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून तो वापरण्यास सुरुवात केली आहे. तरीही जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा उरणार आहे.

भातसाने तळ गाठला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांपैकी भातसा धरणाची क्षमता 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटरची असून मुंबईला  सर्वाधिक पाणीपुरवठा भातसातून केला जातो, मात्र यंदा भातसा धरणाने तळ गाठला असून पाण्याची पातळी शून्यावर आली आहे.

20 जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

n भातसा ……………………  0

n अप्पर वैतरणा …………..  0

n मोडक सागर ……  19,657

n तानसा ……………  31,049

n मध्य वैतरणा …..  19,386

n विहार ………………  5,035

n तुळशी ………………  1,925