शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ, कर्नाटक हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

karnataka-high-court

पुरुषांच्या शौचालयातील भिंतीवर विवाहित महिलेचा नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल कर्नाटकच्या हायकोर्टाने नुकताच दिला आहे. प्राथमिक आरोग्य पेंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून काम करणाऱया महिलेने सरकारी कामासाठी आपला मोबाईल नंबर पेंद्रातील अधिकाऱयांना दिला होता. परंतु अचानक तिला विविध क्रमांकांवरून वेळी-अवेळी कॉल येऊ लागले. यात काहींनी आक्षेपार्ह बोलायला सुरुवात केली. काहींनी शिवीगाळ आणि धमकीही दिली. याचा अधिक तपास केल्यानंतर महिलेला समजले की, बंगळुरूमधील पुरुषांच्या शौचालयातील भिंतीवर तिचा मोबाईल नंबर कॉल गर्ल म्हणून लिहिला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 38 वर्षीय अल्ला बक्ष पटेलविरुद्ध गुन्हा दाखल केला. पटेल याने आरोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळली.