जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याती आखेगाव बस स्टँड चौकातील चार दुकाने आणि काटेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञान चोरट्यांनी फोडली. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशातच आखेगावात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी झाल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बस स्टँड चौकातील अमोल तुकाराम पायघन यांच्या छत्तपती ऑनलाइ सेवा बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून 1 लाख 40 हजार रुपये रोकड लंपास केली, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी वापरली जाणारे डिव्हीआर यंत्र आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी संजच श्रीधर पायघन यांच्या माऊली कृषी सेवा केंद्रावर डल्ला मारत दुकानातील कांदा, कपाशी, टरबूज बियाण्यांची पाकिटे आणि आठ ते दहा हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. कृषी सेवा केंद्राच्या शेजारी असणाऱ्या कृष्णा पायघन यांच्या बालाजी मेडिकलचे कुलूप तोडून दुकानातील हजारो रुपये किंमतीच्या कॉस्मोटिक वस्तू चोरल्या. त्यानंतर त्यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या किरण वाडेकर यांच्या रिद्धी सिद्धी मेडिकल दुकान फोडून वीस हजार रुपये किंमतीचे कॉस्मेटिक तसेच चिल्लर लंपास केली. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आखेगाव शिवारातील काटेवाडी येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरातील दानपेटी उचलून नेली. दानपेटीत पंधरा हजार रुपयांच्या आसपास रक्कम असावी अशी शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली. चोरीच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करुन गावात गस्त वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.