रिझर्व बँक ऑफ इंडियाची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर करडी नजर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोटक महिंद्रा बँक, पेटीएम बँक तसेच अनेक सहकारी बँकांवर आरबीयने कारवाईचा बडगा उभारला आहे. अशातच आता मुंबईतील The City Co-operativ Bank Ltd आरबीआयच्या रडारवर असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने मुंबईतील The City Co-operativ Bank Ltd या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मार्गदर्शन तत्वे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच पुरेसा निधी बँकेत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिटी बँकेला आरबीआयने अनेक वेळा सुधारणा करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र सिटी बँकने आरबीआयच्या सुचनांकडे वारंवार दुर्लक्ष केले, तसेच त्यांच्या कामकाजात कोणताही बदल आरबीआयला दिसला नाही. त्यामुळेच आरबीआयने ही कारवाई केली आहे.
सिटी बँकेचा परवाना रद्द केला असला तरी ग्राहकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. त्याची नियमावली आरबीआयने जाहिर केली आहे. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बँकेत खाते असलेल्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळणार आहे. ग्राहकाच्या खात्यात 5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर ती रक्कम सध्या मिळणार नाही. त्यामुळे फक्त 5 लाख रुपये ग्राहकांना काढता येणार आहेत.