लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. शरद पवार यांनी दौरे आणि गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बारामतीत शरद पवार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. मोदींची गॅरंटी राहिली नाही, असा भीमटोला शरद पवार यांनी लगावला.
बारामती, पुरंदर, इंदापूर आणि भोरमध्ये विविध गावांना शरद पवार यांनी भेटी दिल्या. पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील अडचणी समजून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. बऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत, त्या बद्दल मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. दुष्काळी भागाबाबत अनेक प्रश्न आहेत. योजना झाल्या त्या माझ्या सहीने झाल्या होत्या. त्या बाबत काही धोरणात्मक निर्णय आहेत. त्यांनी बैठक घ्यावी अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. त्यातून काहीतरी अनकुल व्हावे, असे आपल्याला वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
‘दुधाचा दर 5 रुपयांनी वाढवा’
पाण्याचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे. तसाच शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. दुधाचा खर्च आणि त्याची मिळणारी किंमत याचा मेळ बसत नाही, असं सांगण्यात आलं आहे. दुधाचा दर 5 रुपये वाढवला जावा. सरकारनं अनुदान जाहीर केलं. पण ते त्यांना मिळालं नाही. आजचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या अधिकाऱ्यांची आणि परवा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार आहे. संसदेचं सत्र आता सुरू होईल. ते संपलं की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष ज्या-ज्या ठिकाणी निवडणूक लढतील, तिथं जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील, असेही शरद पवार म्हणाले.
‘मराठा, ओबीसी आरक्षणावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये’
मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गजर आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे. आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
‘जनतेचा कल महाविकास आघाडीकडे’
भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदीसाहेबांची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या 48 जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने 30, 31 जागा जिंकल्या. विधानसभेच्या मतदारसंघांचा विचार केला तर, 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. 288 जागेची विधानसभा त्यातील 155 मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे आहे. त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहोत, असेही शरद पवार म्हणाले.