आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाची डीएनए चाचणी होणार

आइस्क्रीमच्या पाकिटात सापडलेल्या ‘त्या’ बोटाचा छडा लावण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. आइस्क्रीम पॅकिंग करताना अपघात झाल्याने कर्मचाऱयाचा बोटाचा तुकडा त्या पाकिटात पडला होता. त्या कर्मचाऱयाची ओळख पटली आहे. बोटाचा डीएनए केला जाणार आहे. त्या अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत.

तक्रारदार हे डॉक्टर असून ते मालाड येथे राहतात. गेल्या आठवडय़ात तक्रारदार याच्या बहिणीने एका ऑनलाइन अॅपवरून बेसन पीठ आणि आइस्क्रीमची ऑर्डर केली. काही वेळाने डिलिव्हरी बॉय त्यांच्या घरी आला. जेवण झाल्यावर ते सर्व आइस्क्रीम खात होते. आइस्क्रीम खाताना तक्रारदार यांच्या तोंडात तुकडा आला. त्याने तो तुकडा बाहेर काढला तेव्हा तो नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित आइस्क्रीम पंपनीशी संपर्क साधला. आइस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा आल्याची तक्रार पंपनीकडे केली. तक्रार केल्यानंतरदेखील त्यांना पंपनीने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आइस्क्रीम पंपनीच्या कर्मचाऱयाविरोधात भादंवि कलम 272 (खाद्यपदार्थ भेसळ) आणि 336 (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) यानुसार गुन्हा दाखल केला. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, महेश मुंडे आदी पथकाने तपास सुरू केला.  तपासादरम्यान पुण्याच्या एका फॅक्टरीमध्ये ते आइस्क्रीम तयार करण्यात आल्याचे समोर आले होते.

महिनाभरापूर्वी ते आइस्क्रीम तयार करण्यात आले होते. आइस्क्रीम पॅक करताना अपघात झाल्याने त्या कर्मचाऱयाचा बोटाचा तुकडा त्यात पडला अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्या बोटाचा नमुना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे. त्या कर्मचाऱयाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.