बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका जोडप्याने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूमध्ये जिवंत कोब्रा आढळल्याने सगळ्यांना धक्का बसला. या जोडप्याने Xbox कंट्रोलरची Amazon वरून ऑनलाइन ऑर्डर दिली होती. मात्र आलेल्या पार्सलमध्ये विषारी साप आढळून आला. सुदैवाने हा विषारी साप पॅकेजिंग टेपमध्ये अडकल्यामुळे कोणलाही इजा झाली नाही.
सदर घटना रविवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेचा या जोडप्याने व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आम्ही 2 दिवसांपूर्वी Amazon वरून Xbox कंट्रोलरची ऑर्डर दिली होती. रविवारी आमचे पार्सल आम्हाला भेटले. मात्र ते उघडून पाहिले तेव्हा त्यात एक जिवंत साप आढळला. सुदैवाने तो साप पॅकेजिंग टेपला चिकटला होता. त्यामुळे आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील कोणालाही इजा झाली नसल्याचे जोडप्याने त्या पोस्टद्वारे सांगितले.
‘एवढी मोठी चूक होऊनही Amazon ग्राहक सेवेने आम्हाला 2 तास प्रतिक्षेत ठेवले. तब्बल 2 तास Amazon कडून कोणतीही मदत मिळाली नासल्याचे जोडप्याकडून सांगण्यात आले आहे. या पार्सलचे आम्हाला पूर्ण पैसे परत मिळाले आहेत. मात्र Amazon च्या निष्काळजीपणामुळे कोणाच्याही जीवावर बेतू शकते. हा ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. एवढ्या गंभीर त्रुटीचे उत्तर कोण देणार? असा सवाल या जोडप्याने त्यांच्या पोस्टद्वारे केला आहे.
ग्राहकाच्या व्हिडिओला प्रतिसाद देत कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. Amazon ऑर्डरमुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही हे प्रकरणात जातीने लक्ष घालत आहोत. तुम्ही देखील सहकार्य करावे. या प्रकरणाबाबतची आवश्यक ती माहिती आमच्या पर्यंत पोहोचवावी. आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल, असे ग्राहकाला प्रतिसाद देत कंपनीने ट्विट केले आहे.