पुण्यात बड्या बापाच्या लाडक्या बाळाने पोर्शे कारने जोडप्याला उडवल्याचे प्रकरण देशभरात गाजत असताना आता चेन्नईतही हिट अँड रनचे एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आले आहे. चेन्नईत राज्यसभा खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला BMW कारने चिरडले. या घटनेमध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर खासदाराच्या मुलीला पोलीस स्थानकातूनच तात्काळ जामीन मंजूर झाला.
ही घटना सोमवारी रात्री (17 जून) घडली आहे. वायएसआर काँग्रेस पार्टीचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी हिच्यावर फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेमध्ये 24 वर्षीय सूर्या याचा मृत्यू झाला. तो पेंटिंगचे काम करत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. ‘NDTV’ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा माधुरी नशेमध्ये धुंद होती. ती स्वत: कार चालवत होती आणि कारमध्ये तिच्यासोबत एक महिलाही होती. चेन्नईच्या बेसेंट नगर भागात फुटपाथवर झोपलेल्या सूर्याच्या अंगावर माधुरीने आलिषान गाडी चढवली. अपघातानंतर माधुरी तिथून फरार झाली, तर गाडीतील दुसरी महिला खाली उतरून लोकांशी हुज्जत घालू लागली.
अटक आणि तात्काळ जामीन
अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत सूर्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सदर BMW कार वायएसआरचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांच्या समुहाची असून पुद्दुचेरी येथे रजिस्टर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी माधुरी हिला बेड्या घातल्या. मात्र पोलीस स्थानकामधूनच तिला तात्काळ जामीनही मंजूर केला. यानंतर मयत सूर्याच्या कुटुंबियांनी आणि कॉलनीतील लोकांनी जे-5 शास्त्रीनगर पोलीस स्थानकाला घेराव घालत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मोबाईल नंबरद्वारे केले ट्रॅक
दरम्यान, अपघातानंतर माधुरीसोबत असणाऱ्या महिलेने आम्ही रुग्णवाहिकेला फोन कॉल केला असल्याचे सांगितले. अपघातानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून हे स्पष्ट झाले आहे. मात्र अपघातस्थळावरून फरार झालेल्या आरोपी माधुरी हिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईल ट्रॅकरचा वापर केला. माधुरी आणि तिच्या मैत्रिणीला मोबाईल नंबरद्वारे ट्रॅक करण्यात आले आणि अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केल्याने पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.
Pune hit and run: 17 वर्षीय तरुणाविरोधात प्रौढ म्हणून खटला चालवावा; पोलिसांकडून अंतिम अहवाल सादर
कोण आहेत बीडा मस्तान राव?
बीडा मस्तान राव हे आंध्र प्रदेशचे बडे नेते आणि उद्योजक आहेत. 165 कोटी संपत्तीचे ते मालक असून त्यांचा बीएमआर ग्रुप हा फूड इंडस्ट्रीतील नामांकीत ब्रँड आहे. बीडा मस्तान राव हे 2009 ते 2019 पर्यंत टीडीपीमध्ये होते. त्याआधी 2009 ते 2014 या काळात ते कवाली मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना वायएसआर काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले.