हिंदुस्थानचा ‘गोल्डन बॉय’ निरज चोप्रा ऑलिम्पिकआधी फॉर्मात आला आहे. पावो नुरमे गेम्समध्ये निरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 85.97 मीटर भाला फेकला.
मंगळवारी फिनलँडच्या तुर्कूमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत हिंदुस्थानकडून निरज चोप्राने भाग घेतला होता. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. पॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी निरज चोप्रा फॉर्मात आल्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
पावो नुरमे गेम्समध्ये निरज पहिल्या स्थानावर राहिला, तर फिनलँडचा टोनी केरेनन याने 84.19 मीटर दूर भाला फेकत रौप्यपदक जिंकले. फिनलँडचाच ओलिव्हर हेलँडर हा तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 83.96 मीटर दूर भाला फेकत कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, या स्पर्धेत निरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले असले तरी त्याची कामगिरी तशी साधारणच राहिली. त्याला एकदाही 90 मीटरच्या आसपास भाला फेकता आला नाही. त्याने पहिल्या प्रयत्नात 83.62 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 83.45 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर, चौथ्या प्रयत्नात 82.21 मीटर, पाचवा प्रयत्ना फाऊल राहिला आणि सहाव्या प्रयत्नात 82.97 मीटर भाला फेकला.
निरज चोप्रा याने 2022 मध्ये 89.30 मीटर भाला फेकत रौप्यपदक जिंकले होते. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वर्षी झालेल्या डायमंड लीगमध्ये निरजने 89.94 मीटर भाला फेकला होता. मात्र त्यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये त्याला एकदाही आपल्या सर्वोत्तम कामगिरीजवळही पोहोचता आलेले नाही.