ठसा – ध्येयवादी प्रकाशक

>> अरुण करमरकर

राष्ट्रीय  विचारांचा प्रसार आणि जागर सर्वत्र व्हावा हे ध्येय उराशी बाळगून त्यासाठीच स्थापन केलेल्या ‘परममित्र पब्लिकेशन’चे संस्थापक माधव जोशी यांची निष्ठा दृढ आणि स्पष्ट होती, पण मुक्त विचारांचेही स्वागत होते. सद्विचार, सदाचार यांच्याशी तडजोड न करण्याचा निग्रह अतूट होता, पण तशी तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या अन्य गुणांची कदर करण्यात संकोच नव्हता. मात्र सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या बाबतीत औदार्याचाही अतिरेक नव्हता. मित्र माधव जोशींच्या वृत्ती-प्रवृत्तीची मला जाणवलेली ही काही ठळक वैशिष्टय़े. माझा त्याचा परिचय, संपर्क तर 50-55 वर्षांपासूनचा, तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात राहून तो प्राथमिक शिक्षण घेत असल्याच्या दिवसांपासून. दादा (पांडुरंग शास्त्री) आठवले आणि दादा जोशी (माधवचे वडील) हे घनिष्ठ सहकारी. दादा तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या पाठशाळेत आचार्य होते. तेथेच जोशी कुटुंब राहत होते. त्यामुळे माधवलाही बालपणीच शास्त्रीजींचा सहवास, स्नेहस्पर्श लाभला. त्याचा स्वाभाविक परिणाम माधवच्या जाणिवांवर होता.

रुईया महाविद्यालयातून एम.ए.पर्यंतचे शिक्षण ते घेत असतानाच अ. भा. विद्यार्थी परिषदेत सक्रिय, नंतर काही काळ राजकोट (गुजरात) येथे पूर्णवेळ काम. 1986 साली त्या कामातून परतल्यानंतर लौकिक जीवन सुरू करण्याविषयीही त्याच्या मनात विशिष्ट विचार होता. प्रारंभी काही काळ तरुण भारत असोसिएटस, मुंबई तरुण भारतमध्ये व्यवस्थापकीय विभागात नोकरी केली. काही काळ थेट मेघालयातही एका कंपनीत (विनय सिमेंट) नोकरी केली. मात्र अशा गतानुगतिक कामात त्याला रमायचे नव्हतेच. वैचारिक क्षेत्रात साहित्य निर्मितीची भूमिका घेत ‘आपला परममित्र’ नावाचे नियतकालिक त्याने सुरू केले. पुढे त्यातूनच ‘परममित्र पब्लिकेशन’चा जन्म झाला. माधव स्थिर चित्ताने वाटचाल करीत होता. दादा, आई याबाबतीत ठामपणे त्याच्या पाठीशी उभे होते ही मोठी जमेची बाजू होती. पुढे पत्नी स्वाती हिनेही तीच भूमिका सुरू ठेवली हे विशेष.

प्रकाशन संस्था, त्याद्वारे प्रसिद्ध करण्याच्या पुस्तकांचे विषय, त्यांचे लेखक इ. बाबतीत मात्र सवंग अर्थप्राप्तीचा दृष्टिकोन माधवने कटाक्षाने टाळला. ‘पॉप्यूलिस्ट आणि पेइंग’ साहित्य प्रकाशित करण्याच्या दिशेला तो वळलाच नाही. पुस्तकांचे विषय आणि लेखक निवडण्याच्या बाबतीत परममित्रचा दृष्टिकोन हा स्वतंत्रपणे दखल घेण्याजोगा विषय आहे. येथे नमुन्यादाखल काही पाहू, ‘प्रिय भीमास’ हे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितेतर कवींनी केलेले काव्यमय अभिवादन संकलित करणारे पुस्तक, ‘सारे काही समष्टीसाठी’ हे कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या चिंतनशील लेखांचे पुस्तक, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सखोल अभ्यासातून साकार केलेले ‘शिवचरित्र’ (Shivaji – His Life and Times), अमेरिका, रशिया, ब्रिटन, इस्रायल आदी देशांच्या गुप्तहेर यंत्रणांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथांची मालिका, ‘लोकमान्य टिळकः आठवणी आणि आख्यायिका’ या त्रिखंडात्मक ग्रंथांची पुनर्निर्मिती, अहिल्याबाई होळकर चरित्र, वारी… जपलेल्या आणि जोपासलेल्या वैचारिक दर्जाच्या संदर्भात ही यादी पुरेशी बोलकी ठरावी. The Myth of Hindu Terrorism या स्फोटक पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’) प्रसिद्ध करण्याचा निर्णय काहीसा धाडसाचाच होता. तसेच Water या इस्रायली लेखकाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘जल इस्रायल’) प्रकाशित करण्याचा निर्णयही आर्थिकदृष्टय़ा आकर्षक मुळीच नव्हता. या दोन्ही अनुवादाचे काम त्यांनी आग्रहाने माझ्याकडून करून घेतले.

‘परममित्र पब्लिकेशन’च्या या साऱ्या वाटचालीचा मी अतिशय निकट साक्षीदार आणि काही प्रमाणात सहभागीदारही आहे याची मला धन्यताही वाटते व अभिमानही. त्यानिमित्ताने 1980 पासून माधवशी माझा अत्यंत निकट अन् जिव्हाळय़ाचा संबंध राहिला. खूप जवळून त्याचे निरीक्षण करता आले. कला, साहित्य, संस्कृती यांच्या विविध पैलूंविषयीची आस्था, तसेच जाण त्याच्या ठायी होती. अलीकडे जरासे स्वस्थतेचे दिवस दृग्गोचर होऊ लागले होते. कन्या मुदिता डाटा सायन्ससारख्या क्षेत्रात उंचीचे कर्तृत्व गाजवू लागली आहे. मुलगा भास्वानही व्यावसायिक क्षेत्रात कर्तबगारीच्या दिशेने जाऊ लागला आहे. परममित्रच्या कामावरही मान्यतेची मोहोर उमटू लागलीय. अगदी अलीकडे रोटरी क्लब, ठाणे लेक सिटीतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. प्रकाशन आणि साहित्य क्षेत्रातले विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. आगामी काही महिन्यांनी ‘परममित्र पब्लिकेशन’च्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत अन् अशा स्थितीत ध्यानीमनी, स्वप्नी नसताना शरीरात कुठे तरी दबा धरून बसलेल्या व्याधीने डोके वर काढले. स्नायू दुर्बलतेने (Muscular atrophy) त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या सूक्ष्म परिणाम म्हणून की काय, माधव काहीसा उदास होऊ लागला. प्रसंगी निवृत्तीची भाषाही बोलू लागला. आम्हा निकटवर्तीय मित्रांना ते खटके, पण नकारात्मकता अधिकाधिक टोकदार होतेय हे मात्र लक्षात आले नाही. मग तपासणी, आयसीयू, रक्त घट्ट होणे, मेंदूमध्ये छोटी गाठ, पक्षाघात असे नष्टचर्य सुरू झाले. दुर्दैवाने गेल्या आठवडय़ात त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाचा हा पूर्णविराम अंतःकरणावर एक चरचरीत डाग उमटवून गेला आहे.