पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, खासदार निलेश लंकेंची मागणी

राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून मुंबईसह राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी ही पोलीस भरतीची प्रक्रीया पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. तसे पत्रच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. अशा वेळी भरती घेणे योग्य नाही. तसे पत्र मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना देखील दिलं आहे. पावसामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रॅक्टिस देखील करता आलेली नाही. त्यामुळे सरकारने पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी लंके यांनी केली आहे.

राज्यातील पोलीस दलात रिक्त पदे आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत होता. त्यामुळे गृह विभागाने 17 हजार 471 पदे भरण्याचा निर्णय घेतला. 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी केली गेली. मुंबईसह राज्यात 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांची मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू होत आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱया ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.