उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर निकालात हेराफेरी आणि गोलमाल झाल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्याविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार आहे. त्याविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत बोलताना ‘रविंद्र वायकर हे लोकसभेत जाणार नाहीत’, असा विश्वास व्यक्त केला आहे.
“रविंद्र वायकर शिवसेनेत होते. स्टँडिंग चेअरमन बनले, आमदार बनले. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. मात्र नंतर ईडी सीबीआयच्या भीतीने हा डरपोक माणूस पळाला आणि मिंधे गटात गेला. आता डरपोक माणूस आम्हाला काय ज्ञान देतोय. तुम्ही तुमच्यावरील ईडीच्या केसवर बोला. लवकरच यातलं सत्य बाहेर येईल. या प्रकरणात आम्ही ईव्हीएमवर आरोप नाही केला आम्ही सिस्टीमवर आरोप केला आहे. रिटर्निंग ऑफिसरने जो धोका केला त्यांच्यावर आरोप केले आहेत. 19 व्या फेरीनंतर तिथे बराच बोगस पणा झाला आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून रविंद्र वायकर लोकसभेत नक्कीच नाही जाणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.