पुण्यात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही हिट अँड रनच्या घटना समोर आल्या. ही साखळी वाढतच चालली आहे. उपराजधानीत सोमवारी मध्यरात्री भरधाव कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या चिमुरडय़ासह आठ जणांना चिरडले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत. कारचालक भूषण लांजेवार याला अटक करण्यात आली असून तो दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे उघड झाले आहे.
रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करणारे लोक, महिला आणि मुले फुटपाथवर झोपले होते. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उमरेडकडे जाणाऱया भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट फुटपाथवर चढली. तीन महिला, चार मुले आणि एका पुरुषाला कारने चिरडले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक भूषण लांजेवार घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. आठ जणांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सर्व जखमींना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने कारचालकाला पकडले
भूषण घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही अक्षरशः खंगाळले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. तो दारूच्या नशेत कार चालवत होता. सद्यस्थितीत पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वाठोडय़ाचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली.