मुंबईसह कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय, शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा

आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर मान्सून मुंबई, कोकण पट्टय़ात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकण पट्टय़ात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईसह कोकण पट्टय़ात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणाला दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुढील आठवडय़ात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मुंबईसह राज्यात पावसाला 11 जूनपर्यंत सुरुवात होते. यंदा केरळमध्ये पाऊस दोन दिवस आधीच दाखल झाल्याने मुंबईतही पाऊस दोन दिवस आधीच दाखल झाला. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र 9 जूनला रात्री बरसल्यानंतर पावसाने काही दिवस दडी मारली आहे.

कोकणात जोरदार सरी कोसळणार

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत आज ढगाळ वातावरण होते. मान्सून सक्रिय झाल्याचे हे लक्षण मानले जात आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात कोकण पट्टय़ात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्ग या कोकण पट्टय़ात मुसळधार पावसाचा अंदाज असून पुढील दोन दिवसांसाठी कोकणाला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईतही अधूनमधून जोरदार सरी बरसतील तर एखाद्या दिवशी जोरदार पावसाचा अंदाज आहे, असे कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले.

विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडणार

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. विदर्भातही पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.