विश्वास नसल्यानेच घरातच खासदारकी दिली; रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला

लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंतप्रधान मोदी आणि विरोधकांकडून यावर आरोप-प्रत्यारोप होत होते. आता अजित पवार यांनी आपल्याच घरात खासदारकी दिल्याने घराणेशाहीचा आरोप होत आहे. तसेच त्यांच्या गटातील अनेकजण यामुळे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना जबरदस्त टोला लगावला आहे.

अजित पवार यांचा त्यांच्याच पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी घरातच पुन्हा खासदारकी दिली आहे, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मला पद दिले नव्हते. सुप्रिया सुळे यांनाही अनेक वर्षे पद दिले नव्हते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा ताबा घेतल्या घेतल्याच लगेच घरात खासदारकी दिली. त्यांचा दुसऱ्यांवर विश्वास नाही, असे आता त्यांच्याच गटातील नेते कुजबुज करत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

अजित पवार गटात अनेक गोष्टी सहज सोप्या राहिलेल्या नाहीत. अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन होऊ द्या, फंड मिळु द्या, मग अनेक आमदार निर्णय घेतील. ज्या लोकांनी आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसेल. जे फार विरोधात बोलले नसतील त्यांनाच आम्ही पुन्हा परत घेणार आहोत. इतरांना आमच्या पक्षात घेणार नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.