पोलीस भरतीत डमी उमेदवार पकडण्यासाठी चेहरा ओळख प्रणाली वापरणार, 19 जूनपासून भरती

पोलीस भरतीच्या वेळी डमी उमेदवार उपस्थित राहण्याचे प्रकार रोखण्यासाठी रत्नागिरी पोलीसांनी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पोलीस भरतीच्या वेळी बायोमेट्रीक मशीनचा वापर करताना पहिल्यांदाच चेहरा ओळख प्रणाली या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. 19 जूनपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 170 जागांसाठी पोलीस भरती होणार असून त्याकरीता 8 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरीत होणाऱ्या पोलीस भरतीबाबत माहिती दिली. 19 जूनपासून रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरती होणार आहे. 149 पोलीस अंमलदारांची पदे त्यामध्ये 5 ब्रँडमन आणि 21 चालकांची पदे आहेत. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले की, सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे पोलीस भरतीच्या वेळी काही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पावसामुळे एखाद्या उमेदवाराला पोलीस भरतीकरीता दिलेल्या तारखेला उपस्थित राहता आले नाही तर त्याला राखीव दिवसातील भरतीची तारीख दिली जाणार आहे. अंमलदार आणि चालक या दोन पदांसाठी भरती होत असल्यामुळे जर एखाद्या उमेदवाराने दोन्ही पदांकरीता अर्ज दाखल केला असेल आणि त्याला भरतीची एकच तारीख मिळाली तर त्याला एका पदाकरीता भरतीची दुसरी तारीख देण्यात येईल. उमेदवारांच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या तारखेमध्ये चार दिवसांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. पावसामुळेसुध्दा एखाद्या दिवशी मैदान चाचणी झाली नाही तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. उमेदवारांना भरतीसंदर्भात काही अडचणी असल्यास त्यांनी वॉटसअप क्र. 8888905022 आणि पोलीस अधीक्षक कार्यालय दूरध्वनी क्र. 02352-271257 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा sp. [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा किंवा विशेष पोलीस महानिरिक्षक यांचा दूरध्वनी क्र.022-27563257 आणि ईमेल आयडी ig. [email protected] येथे संपर्क साधावा असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये 

पोलीस भरती करुन देतो असे सांगून कोणी आमिष दाखवत असेल तर त्याला उमेदवारांनी बळी पडू नये. असे प्रकार घडू नये याकरीता आम्ही विशेष उपाययोजनाही हाती घेतली आहे. अशाप्रकारे कोणी आपल्याला आमिष दाखवले, आर्थिक देवाण- घेवाणीच्या गोष्टी केल्या तर पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी, दूरध्वनी क्र. 02352-222893 आणि टोल फ्री क्र.1098 वर संपर्क करावा किंवा [email protected] वर ई मेल करावा. पोलीस अधीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02352-271257 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

पोलीस भरतीच्या वेळी डमी उमेदवार येऊन उपस्थित राहू नयेत याकरीता यंदा आम्ही प्रथमच चेहरा ओळख प्रणाली वापरणार आहोत. तसेच बायोमेट्रीकच्या सहाय्याने उमेदवारांच्या बोटांचे ठसे घेणार आहोत. जेणेकरून डमी उमेदवार आल्यास तो तात्काळ ओळखता येईल.
– धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी