अमोल कीर्तिकरांच्या निवडणूक निकालासंदर्भात कारवाई करा, अन्यथा… आदित्य ठाकरेंनी दिला खणखणीत इशारा

मुंबई-उत्तर पश्चिम मतदार संघाच्या लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना नेते, उपनेते आणि मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर निशाणा साधला. EC हे Election Commission नसून Entirely Compromised हे असं आहे, असा घणाघाती आरोप केला आहे. तसंच आजच्या पत्रकार परिषदेतून सूचना लक्षात घेऊन अमोल कीर्तिकरांच्या निकालासंदर्भात कारवाई करा, अन्यथा कायदेशीर मार्गानं पाठपुरावा करून हा विजय हातात घेणार म्हणजे घेणारच अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावलं.

लोकसभा निवडणुकांचा निकालासंदर्भात देशभरातच नाही तर जगभरात चर्चा सुरू आहे ते EVM च्या सुरक्षिततेसंदर्भात. त्यासंदर्भात एलॉन मस्कने देखील काही विधान केलं आहे, अशी माहिती देत आदित्य ठाकेर यांनी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, देशभरात सध्या मुंबई-उत्तर पश्चिमची जागा चर्चेत आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे त्या जागेवरून लढले आणि खरंतर जिंकले आहेत. मात्र निवडणूक आयोगानं कधी त्यांना एक मतांनी विजयी तर थोड्यावेळानं 600 मतांनी विजयी असं सांगण्यात येत असताना शेवटी पराभूत म्हणून जाहीर केलं. मग विजयी झालेली जागा आम्ही पराभूत झालो कसे? या जागेवर 4 तारखेला विजयाचे आकडे मागे पुढे सुरू होते. शेवटी त्यांनी कीर्तिकर यांना पराभूत जाहीर केलं. 5 जून पासून यावर अनेक चर्चा सुरू आहेत. रिर्पोट येत आहेत. आम्ही हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढणार आहोत. कारण खरंतर आम्ही ही जागा जिंकलो आहोत. ही जागा आमच्या हक्काची आहे. आणि मुंबईकरांनी हुकूमशाहीविरोधात जो निकाल दिला तो जग जाहीर आहे. पण यात गडबड झाली आहे, यातील तात्रिंक गोष्टी आहेत त्या अनिल परब आपल्यासमोर मांडतील. शिवसेना पक्ष आणि चिन्हापासून निवडणूक आयोग हा EC म्हणजे Election Commission नसून एंटायरली कॉम्प्रमाइज असं आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर निषाणा साधला आहे.

देशात काही नेते असंही बोलले होते की EC कुठल्या नेत्याच्या ऑफिसमधून चालतं का? हे देखील संशय व्यक्त होत होते. एवढं सगळं असून INDIA आघाडीने चांगली कामगिरी केली. चांगले आकडे प्राप्त केले. जर ही गडबड केली नसती तर सरकार बनलं असतं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुळात एकच आहे की इथे निवडणूक निकाल प्रक्रिया जी आहे तिथे कुठे ना कुठे घोटाळा झालेला आहे तो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छित आहोत. आता बारकाईच्या गोष्टी कोर्टाच्या समोर येतील. पण ही निवडणूक, इथली निकाल प्रक्रिया Free and Fair झाली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. देशात पारदर्शक निवडणुका व्हाव्यात ही अपेक्षा आहे, मतमोजणी पारदर्शक व्हाव्यात ही अपेक्षा आहे. याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो तो तसा साजरा झाला का? निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की निकाल प्रक्रिया पार पडल्यानंतर कुणाकडून काही अजून आक्षेप आहे का हे तपासून मग सगळ्यांना संतुष्ट करणं की निवडणूक Free and Fair होती निवडणूक अधिकाऱ्यांचं काम नाही का, ते त्यांच्याकडून झालं का? तसंच ज्या प्रेसनोट जारी केल्या जात आहे त्यामध्येही गडबड आहे. आजची ही प्रेस पहिली प्रेस होती. आता ही लढाई सुरू झाली आहे. यासगळ्यावर बोलण्याऐवजी यांच्यामुळे मतं मिळाली त्यांच्यामुळे मतं मिळाली असं करून भाजप लोकांची दिशा भरकटवण्याचे काम करत आहे. उलट भाजपला जी काही मतं मिळाली ती या यंत्रणेचा गैरवापर करून मिळवली आहेत, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. निवडणूक आयोगानं आजच्या पत्रकार परिषदेवरून सूचना घ्यावी आणि यासंदर्भात कारवाई करावी. अन्यथा कायदेशीर मार्गानं लढाईसाठी आम्ही तयार असून पूर्णपणे पाठपुरावा करून आम्ही हा विजय हातात घेणार म्हणजे घेणार, असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं.