एअर इंडियाच्या विमानात काही खाण्यापासून सावधान! खाद्यपदार्थात सापडलं ब्लेड

एअर इंडिया एअरलाइन्समधील त्रुटींच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. एअर इंडियाच्या बेंगळुरू-सॅन फ्रान्सिस्को (यूएस) विमानात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. फ्लाइटमध्ये एका प्रवाशाला त्याच्या जेवणात धातूचे ब्लेड सापडले. ही घडना 9 जून रोजी घडली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणातील या मोठ्या निष्काळजीपणाबाबत विमान कंपनीनेही आपली चूक मान्य केली आहे. यासोबतच त्यांनी एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये मॅथर्स पॉल नावाचा प्रवाशी 9 जून रोजी प्रवास करत होता. यावेळी प्रवासात त्याने भाजलेले रताळे आणि अंजीर चाट ऑर्डर केले होते. प्रवासी अन्न खात असताना अचानक त्याच्या तोंडात कडक पदार्थ आल्याचे त्याला जाणवले. त्याने तपासणी केली असता तो इतर कोणताही पदार्थ नसून धातूचा ब्लेड असल्याचे समोर आले. पॉलने त्या पदार्थाचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे एअर इंडियाचा निष्काळजीपणा उघड झाला.

एअर इंडिया कंपनीने केलेल्या निष्काळजीपणाबाबत आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा यांनी घडलेल्या प्रकाराचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘आमच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात एक धातूचा पदार्थ आढळून आला. हा पदार्थ आमच्या विमानातील केटरिंग पार्टनर वापरलेल्या भाजी प्रोसेसिंग मशीनमधून आला आहे. ही बाब तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आली आहे. या संदर्भात आम्ही आमच्या संपूर्ण टीमला कामात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.’ तसेच या घटनेबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त केला आहे.