उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी ईव्हीएम हॅक केल्याचे उघड झाले आहे. मतमोजणी केंद्रात वायकर यांचा मेहुणा जो मोबाईल घेऊन फिरत होता त्या मोबाईलवर ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी येत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत रविंद्र वायकर यांना शपथ घेण्यापासून थांबवावे , अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
”उत्तर पश्चिमचा निकाल हा संपूर्ण निकाल प्रक्रियेतला आदर्श घोटाळा आहे. भाजप व त्यांच्या टोळ्यांनी कशा प्रकारे विजय मिळवला. त्याचं उत्तम उदाहरण हे उत्तर पश्चिम मुंबई आहे. भाजपने निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन जिथे जिथे 500 ते 1000 मतांनी पराभव दिसत होता. तिथे हा घोटाळा केलाय. कीर्तिकरांना दोनदा विजयी घोषीत केलेले होते. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला. त्यात रिटर्निंग ऑफिसर वंदना सुर्यवंशी यांचा मोठा हात आहे. सुर्यवंशी यांना कुणाचा तरी फोन आलेला. त्यानंतर चित्र बदललं. उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. त्या सीसीटीव्ही फुटेज तपासायची परवानगी का देत नाहीत. वंदना सूर्यवंशींचा फोन देखील ताब्यात घेतला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
”या सर्व प्रकरणात वनराई पोलीस कारवाई करत आहेत. ज्या फोनने ईव्हीएम अनलॉक झाले तो फोन जप्त केल्यानंतर वायाकरांचा जवळचा नातेवाईक असलेला एक रिटार्ड पोलीस अधिकारी सातारकर गेल्या चार दिवसांपासून सतत तिथे जात होता. त्याला फोन बदलायचा होता का? तो तिथे का गेलेला? पोलीस स्थानकात काय डील झाले आहे? या पोलीस ठाण्याचे प्रभारी राजभर यांनी फोन जप्त केल्यानंतर त्यांना रजेवर का पाठवले आहे? असे अनेक प्रश्न आहेत. आता जप्त केलेला तो फोन फॉरेन्सिक लॅब मध्ये गेला आहे. राज्यातील सर्व लॅबचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. त्या उपर एकनाथ शिंदे आहेत. वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झालाय का? त्यांचं तिथे काय डील झालंय हे सांगा. हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय व संशयास्पद आहे. त्यामुळे रविंद्र वायकर यांना शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे. शहनिशा होत नाही तोपर्यंत त्यांना शपथ घेण्यापासून थांबवणं ही लोकशाहीच आहे. अशा प्रकारचे देशभरात जवळपास 45 निकाल लावण्यात आले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.