पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडी धडकली; भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

पंश्चिम बंगालमधील रंगापानी रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी रेल्वेचा भीषण अपघात झाला. सिग्नल लागलेल्या कांचनगंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की कांचनजंगा एक्स्प्रेसचे मागील तीन डबे घसरले. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 50 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे एक्स्प्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहिली आहे. ‘दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा येथून एका दुःखद रेल्वे अपघाताची माहिती मिळाली. मला धक्का बसला. घटनास्थळी बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तातडीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.