सलमान खानला धमकी देणारा अटकेत; युटय़ुब चॅनलवर धमकीचा व्हिडीओ अपलोड

‘अरे छोडो यार’ या युटय़ुब चॅनलवरून अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे ठार मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ अपलोड झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने राजस्थान येथून एकाला अटक केली. बनवारीलाल गुजर असे त्याचे नाव आहे. त्याने सलमानबाबत 10 व्हिडीओ अपलोड केले होते. गुजर हा गुंड लॉरेन्स बिष्णोईचा मित्र असल्याचा दावा करायचा. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिनेता सलमान खानचे वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंट येथे घर आहे. 14 एप्रिलला पहाटे बिष्णोई गॅंगच्या हल्लेखोरांनी सलमानच्या घरावर गोळीबार करून पळ काढला होता. त्याची दखल घेत क्राईम ब्रँच युनिट-9ने तपास सुरू केला. युनिट-9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने सागर पाल, विकी कुमार गुप्ताला बेडय़ा ठोकल्या होत्या. तसेच गुजरात येथे जाऊन पाल आणि गुप्ताने नदीत टाकलेली पिस्तूलदेखील पोलिसांनी जप्त केली होती. त्या दोघांच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेच्या एसआयटीने सोनूकुमार बिष्णोई आणि अनुज थापनला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुजरात येथून सागर पालला बेडय़ा ठोकल्या होत्या.

नुकताच सलमानच्या जवळच्या मित्राने युटय़ुबवर ‘अरे छोडो यार’ चॅनल्सवर सलमानला जीवे ठार मारण्याचा धमकावणारा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर त्याने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाने सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक राजस्थानच्या बोर्डा गावात गेले. तेथे फिल्डिंग लावून पोलिसांनी बनवारीलालला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोबाईल ठरणार महत्त्वाचा
पोलिसांनी बनवारीलालकडून एक पह्न जप्त केला आहे. त्या पह्नमध्ये काही नोंदी आढळून आल्या आहेत. त्या पह्नची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर तो फॉरेन्सिक लॅबला पाठवणार असल्याचे समजते. त्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

बनवारीलाल होता बिष्णोईचा मित्र?
बनवारीलाल हा बीएसई बीएड आहे. तो गुंड लॉरेन्स बिष्णोईचा मित्र असल्याचा दावा करत असायचा. नुकताच एक सलमानला जीवे ठार मारण्याबाबतचा व्हिडीओ अपलोड केला गेला होता. सलमानला कशा प्रकारे मारले जाऊ शकते असे त्या व्हिडीओमध्ये होते. त्या युटय़ुब चॅनल्सवर सलमानबाबत एकूण 10 व्हिडीओ असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुंदी गावात दहशत निर्माण व्हावी यासाठी तो आपण बिष्णोईचा मित्र असल्याचे सांगत असायचा.