भाजप 400 पार गेला असता तर भारत हिंदू राष्ट्र बनले असते! तेलंगणाचे आमदार टी. राजा यांचे विधान

लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार जागा जिंकल्या असत्या तर हा देश हिंदू राष्ट्र बनला असता, असे विधान तेलंगणामधील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केले. पडघ्यात झालेल्या संतसंमेलन व हिंदू धर्मसभेत टी. राजा सिंह यांनी भाजपचा अजेंडा उघड केला. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शनिवारी रात्री झालेल्या या धर्म सभेत महंत शिर चिदानंद सरस्वती, स्वामी गोविंदगिरी, महंत फुलनाथ बाबा, आयोजक शिवरुपानंद स्वामी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंदू धर्माविषयी विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले असतानाच भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेऊन राजकीय भाष्य करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आम्ही 400चे टार्गेट ठेवले होते. पण ते दुर्दैवाने पूर्ण झाले नाही. जर यश मिळाले असते तर निश्चितपणे देश हिंदू राष्ट्र बनले असते.

किल्ल्यांवरील मशिदी, दर्गे हटवा

पडघ्यातील संमेलनात टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील मठ, मंदिरांवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, मठ, मंदिरे सध्या सुरक्षित नसून त्याचा सर्वांनीच विचार करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 370 किल्ले जिंकले, पण त्यातील 100 किल्ल्यांवर सध्या मशीद आणि दर्गे बनवण्यात आले असून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणीही टी. राजा सिंह यांनी केली.

हे ठराव मंजूर

  • धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा
  • वक्फ बोर्ड कायदा रद्द करा
  • लव्ह जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा
  • सक्तीची गोहत्या बंदी
  • हिंदूंच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात यावे.
  • वक्फ बोर्ड कायदा रद्द करून जमिनी ताब्यात घ्या

महाराष्ट्रात एक लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असून देशभरात दहा लाख एकर जमीन या बोर्डाच्या ताब्यात आहे, असे स्पष्ट करून भाजपचे आमदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा त्वरित रद्द करावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालय, क्रीडांगण, महाविद्यालये आणि घरे बांधावीत, अशी जाहीर मागणीही टी. राजा सिंह यांनी धर्म सभेत केली.