
नेहरू-गांधी घराणे, काँग्रेस नेते यांच्यासंदर्भात भाजप नेते अनेकदा पातळी सोडून बोलतात. मात्र केरळमधील भाजपचे खासदार, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. गोपी यांनी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांचे कौतुक केले. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ‘मदर ऑफ इंडिया’ होत्या, असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.
केरळमध्ये पहिल्यांदा भाजपने खाते उघडले आहे. प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी हे त्रिशुर मतदारसंघातून निवडून आले. गोपी यांनी पुनकुनम येथे दिवंगत काँग्रेस नेते के. करुणाकरण यांच्या मुरली मंदिर स्मारकाला भेट दिली. विशेष म्हणजे गोपी यांनी करुणाकरण यांचे पुत्र के. मुरलीधरन यांचा पराभव केला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आलो आहोत. करुणाकरण हे केरळमधील काँग्रेसचे पितामह होते. इंदिरा गांधी या ‘मदर ऑफ इंडिया’ आहेत, असे सांगतानाच सुरेश गोपी यांनी कम्युनिस्ट नेत्यांबाबतही कृतज्ञता व्यक्त केली.