
यंदा दोन दिवस लवकर दाखल झालेल्या मान्सूनचा मुंबईतील जोर कमी झाला आहे. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे जिह्यात पुढील पाच दिवस पाऊस गायब असणार आहे. या अवधीत तापमानात पुन्हा 34 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात 21 जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी वादळाने मान्सूनची वाट रोखली होती. यंदाही मान्सूनचा मुहूर्त चुकतो की काय, अशी शंका मुंबईकरांना सतावत होती, मात्र मान्सूनने दोन दिवस आधीच 9 जूनला मुंबईत एंट्री केली. पुढे तीन-चार दिवस अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस गायब झाला आहे.
वातावरणात अचानक मोठा बदल झाला असून पुढील पाच दिवस मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसत नाही. मुंबई, ठाण्यात 21 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पाच दिवसांनंतर हळूहळू नैऋत्य वारे सक्रिय होतील आणि पावसाचा जोर वाढेल, असे हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेतील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
लाहीलाही वाढणार
मे महिन्याच्या अखेरीस मुंबई-ठाण्यात जणू भट्टी पेटल्याची होरपळ नागरिक सहन करीत होते. मान्सूनच्या एंट्रीनंतर नागरिकांना होरपळीपासून मोठा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा पाऊस गायब झाल्याने पारा 34-35 अंशांपर्यंत वाढून लाहीलाही वाढण्याची चिन्हे आहेत.
तलाव क्षेत्राकडेही पाठ
शहर परिसराबरोबरच तलाव क्षेत्रातही पावसाने निराशा केली आहे. तलावांच्या परिसरात पावसाची ‘स्लो बॅटिंग’ सुरू आहे. मागील चार दिवसांत तुळशी तलावात 135 मि.मी., विहार तलावात 134 मि.मी. पाऊस बरसला आहे. तसेच भातसा तलावात 88 मि.मी., मध्य वैतरणा- 73 मि.मी., मोडक सागर – 65 मि.मी., तानसा – 64 मि.मी. आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे 42 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर न वाढल्यास मुंबईवरील दहा टक्के पाणीकपातीचे संकट लवकर दूर होण्याची चिन्हे नाहीत.