पुणे हिट ऍण्ड रन – बाल न्यायमंडळाच्या सदस्यांना ‘शो-कॉज’

कल्याणीनगर अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून चुका राहिल्या, असा अहवाल चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या महिला व बालविकास विभागाच्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याणीनगर भागात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले. त्यावेळी अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करणे आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

हा जामीन मंजूर करताना निकषांचे पालन केले की नाही, हे तपासण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली  होती. या समितीने चौकशीचा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.