ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला यंदाचा बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला. तर तुळजापूर येथील युवा कादंबरीकार देवीदास सौदागर यांच्या ’उसवण’ या कादंबरीला युवा पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आज नवी दिल्ली येथे विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा केली. मराठी भाषेच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून राजीव तांबे, विजय नगरकर, विनोद शिरसाठ यांनी काम पाहिले. तर युवा पुरस्काराचे परीक्षक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उमरीकर होते. भारत सासणे यांनी दीर्घकथांसह किशोर व कुमारांसाठी मोठय़ा प्रमाणावर कथा व कादंबऱया लिहिल्या आहेत. सासणे हे उदगीर येथे 2022 साली पार पडलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सासणे यांनी 1980 पासून कथा लिहिण्यास सुरुवात केली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये दिसून येते.
लेखक देवीदास सौदागर हे कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत त्यांची ‘उसवण’ कादंबरी टेलरिंग व्यवसायातले चटके वाचकांसमोर ठेवते.
“साहित्य अकादमीचा पुरस्कार बाल विभागातून मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षे मी बालसाहित्य लिहित आहे. या कादंबरीतील पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. कुमार व किशोर मुलांसाठी विशेष पात्र निर्माण करावे, अशी इच्छा होती. निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून किशोर व कुमारवयीन मुलांना बुद्धीचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न मी ‘समशेर आणि भुतबंगला’ कादंबरीतून केला आहे. या कादंबरीतील हे पात्र रूजले आहे, याचाही आनंद आहे.
– भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक