>>प्रसाद नायगावकर
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालावी, कोणतीही दुर्घटना घडू नये, गंभीर अपघात झालाच तर जखमींना मदत करण्यासाठी प्रामुख्याने महामार्ग पोलिसांची नियुक्ती केली जाते. त्याचबरोबर महामार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालून त्यांच्यावर कारवाई करण्याची महत्वाची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र या कर्तव्यांना हरताळ फासत करंजी चेक पोस्ट केंद्रावर पोलिसांच्या माध्यामातून जबरदस्ती वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील करंजी चेकपोस्ट (महामार्ग पोलीस मदत केंद्र) सध्या वादाच मुख्य केंद्रबिंदु ठरत आहे. या ठिकाणी सुरू असलेला अंदाधुंद कारभार मागील काही महिन्यांपासून चव्हाट्यावर आला आहे. करंजी चेकपोस्ट हा नागपूर परिक्षेत्राच्या अंतर्गत येते. वर्धा जिल्ह्याच्या सीमारेषेवरील वडनेर आणि वणी-पाटणबोरी ते यवतमाळ एवढी या चेकपोस्टची हद्द आहे. वर्षभरापूर्वी करंजी चेकपोस्टचा कारभार सुरळीत सुरू होता. मात्र कोयलवार नामक अधिकाऱ्याने चेकपोस्टचा चार्ज घेतल्यानंतर ‘हम करे सो कायदा’ अशा पद्धतीने चेकपोस्टचा मनमानी कारभार सुरू झाला. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक या करंजे चेक पोस्टसाठी पैशांचा खजिना ठरत आहे. एन्ट्री पासच्या नावाखाली प्रति वाहनांकडून 500 रुपये आकराले जात असल्याची माहिती समोर आली आहे. वडकी नजीक असणाऱ्या ओम साईराम पेट्रोलियम पंप धारकांचे पासेस एन्ट्री पाससाठी वापरले जात आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपचालकाचे महामार्ग पोलीस मदत केंद्रप्रमुखाशी साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. दररोज हजारो वाहने या महामार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे वाहतूक पासच्या नावाखाली लाखोंचा गल्ला पोलिसांच्या माध्यमातून गोळा केला जात आहे. मात्र हा पैसा जातो कोणाकडे? असा प्रश्न सामन्यांकडून विचारला जात आहे.
करंजी चेक पोस्टवर असा प्रकार यापूर्वी घडत नसल्याचे स्थानिकांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मात्र विद्यमान पोलीस निरीक्षक रुजू झाल्यापासून चेक पोस्टचा कारभार बिघडला असून महामार्ग पोलीस केंद्राचे अक्षरक्ष: बारा वाजल्याचे चित्र आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून या अधिकाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. एन्ट्री पासच्या नावाखाली जमा करण्यात येणारा महसूल आपल्या खिशात घालण्यासाठी या मदत केंद्रप्रमुखाचा खटाटोप सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा सर्व प्रकार पाहता महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कार्यप्रणालीचे धिंडवडे काढणार्या या मदत केंद्रप्रमुखाची हाकलपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.