…त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यावर आम्ही का बोलावे? भाजपच्या वक्तव्यावर शरद पवारांचा पलटवार

महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची एकच जागा जिंकून आली होती. महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसल्याचीही चर्चा होत आहे. राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचा दरारा होता तो कमी झाल्याची चर्चाही रंगत आहे. अजित पवारांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत जबरदस्त पलटवार केला आहे.

राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होते. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होते. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. अजित पवारांना सोबत घेत भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असे विचारल्यावर त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. आम्ही का सांगावे, असे शरद पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेच्या गैरवापरातून जनतेने भूमिका घेतली. जनतेच्या कौलाने सरकार शहाणपणा घेतील असे वाटले होते. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सवालही पैदा नही होता! शरद पवारांचे थेट उत्तर
अजित पवार गटाने जुलै 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले. त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अजित पवारांसोबतचे नेत्यांना घरवापसी करावी अशी वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ‘सवालही पैदा नही होता’, असे थेट उत्तर शरद पवारांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकच गोष्ट सांगितली जायची मोदीं की गॅरेंटी. ती गॅरेंटी काय खरी दिसत नाही. ते नाणं चालतयं असे दिसत नाही. त्यामुळे गॅरेंटीचा विश्वास दिला पण ती गॅरेंटी प्रत्यक्ष कृतीत येत नाही, हे चित्र आज याठिकाणी आहे. यातून मार्ग काढावा लागेल. हा मार्ग काढण्यासाठी एकजुटीने चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करू, असे ते म्हणाले. चार महिन्याच्या निवडणुकीत तुतारीचे राज्य येईल. राज्य आल्यानंतर आता सांगितलेल्या गोष्टींवर मार्ग काढले जातील, असेही शरद पवार म्हणाले.