संपूर्ण देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाहीत, हे अजिंक्य आहे असे वातावरण होते. पण या अजिंक्य असण्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिला. ही लढाई फार विचित्र होती. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीनेही ही लढाई विषम होती. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. देशभक्त आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला कौल दिला. आता या देशाला जाग आली आहे. पण हा विजय अंतिम नाही, लढाई आता सुरू झाली आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी विधानसभा निवडणूकही एकजुटीने लढेल अशी घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. तसेच ‘निर्भय बनो’ ही सामाजिक संघटना, यूट्युबच्या माध्यमातून हेमंत देसाई, प्रशांत कदम, निखील वागळे, अशोकराव वानखेडे, रवीश कुमार या सगळ्यांनी धाडसाने जनतेचे प्रश्न मांडले. त्यांच्या त्या निष्पक्षपातीपणे जनतेची बाजू मांडण्यामुळे जनतेलाही सत्य काय आहे ते कळत गेले, असे म्हणत या सगळ्यांचे कौतुकही उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.
दिल्लीतील एनडीएचे कडबोळे नैसर्गिक की अनैसर्गिक?
येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागतील. इतर राज्यातही निवडणुका होतील. मुळात हे मोदी सरकार आता एनडीए सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस चालेल हाही मोठा प्रश्न आहे. आमच्याबद्दलची ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक युती असे म्हटले जात होते पण दिल्लीत आता जे काही कडबोळे झाले आहे ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. पण एकूणच देशातील जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठे यश आपल्याला मिळाले असे मी मानतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभाही एकत्र लढणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा तीन पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेतात तेव्हा साहजिकच त्याच्या आधी एक संयुक्त प्राथमिक बैठक झालेली असते. येत्या विधानसभेतही जे घटकपक्ष आणि सामाजिक संघटना सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांना बरोबर घेऊन आम्ही लढणार आहोत.
मोदी खाल्ल्या मिठाला जागणार आहेत की नाही?
भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या वोट जिहादविषयी बोलताना ते म्हणाले की, मला वोट जिहाद ही संकल्पनाच कळलेली नाही. कारण मोदींनी त्यांच्या भाषणातच हे सांगितले आहे की, त्यांचे बालपण मुस्लीम कुटुंबीयांच्या सान्निध्यात गेले आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताजियाखालून जायचे, त्यांच्या घरचे जेवण ते जेवायचे. मग आता त्या खाल्ल्या मिठाला ते जागणार आहेत की नाही ते मोदींनीच सांगावे. तसेच देशाची लोकसंख्या 140 कोटीहूीन अधिक आहे. यापैकी किती लोकांना मतदानाा अधिकार आहे याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भाजपालाकिती मतं मिळलीत व उरलेले कित्येक कोटी लोकांनी भाजपच्या म्हणजे मोदींच्याविरोधात मतदान केले ही आकडेवारीही समोर यायला हवी, असेही ते म्हणाले.
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मियांचे मतदान
शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मराठी मत का कमी मिळतील? ‘एम’ फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, यावेळी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मियांनी मतदान केले. त्यात मराठी तर आहेतच. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आमि इतर सर्वच आहेत. रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांच्या डोळ्यांदेखत लुटली जात असेल तेव्हा मराठी माणूस ती लुटणाऱ्या मत देईल का? महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस झोपेत सुद्धा मत देणमार नाही. त्यामुळे भाजपाला अजून वास्तवाची जाणीव झाली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरे जावे लागेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.