बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसचा भीषण अपघात; 8 जण ठार, 7 जखमी

Badrinath Accident: उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या एका बसला भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेल्या एका मिनी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस अलकनंदा नदीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी बसमध्ये 23 जण होते. ही बस भाविकांना घेऊन श्रीनगरहून बद्रीनाथ महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे बचाव पथक आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण आहे की बस चक्काचूर झाली असून अनेकजण बसमध्ये अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान अपघातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मदतकार्य सुरू आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या भीषण अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच धामी यांनी पोलिसांना तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.