प्रत्येक पालकाला आपला शाळेत जाऊ पाहणा-या पाल्याने दर्जेदार शिक्षण घ्यावे असे वाटते. ग्रामीण भागात मात्र हे प्रत्येक वेळेस शक्य होतेच असे नाही. म्हणूनच जिल्हा परिषदेच्या शाळांची दर्जा वाढ करत पटसंख्या वाढविण्यासाठी उन्हाळाभर शाळापूर्व तयारी प्रकल्प राबविल्या गेला. संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे केवळ दुसरे वर्ष आहे. सहा वर्षे पूर्ण केलेल्या इयत्ता पहिलीत दाखलपात्र होऊ शकणाऱ्या 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना यासाठी विशेष लक्ष्य करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 7098 शिक्षकांनी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकांना यासाठी प्रशिक्षण दिले. केंद्रप्रमुख, शिक्षक, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, पर्यवेक्षिका असे सर्व घटक या दाखलपात्र विद्यार्थी प्रवेश कार्यक्रमात सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, दर्जेदार साहित्य दिले गेले. याशिवाय नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांचा सराव देखील करवून घेतला गेला. याचा परिणाम बघता मागील वर्षी देखील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली होती. यंदा त्यात आणखी सुधारणा होण्याची आशा आहे.