4440 कोटींची जमीन आणि विद्यापीठाची इमारत जप्त, फरार खाण माफिया मोहम्मद इक्बालला ED चा दणका

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील बहुजन समाज पार्टीचे माजी आमदार मोहम्मद हाजी इक्बाल यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या जवळपास 4 हजार कोटींहून अधिकच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात 4440 कोटींच्या विद्यापीठाच्या जमिनीचा आणि इमारतीचाही समावेश आहे. ED ने ही संपत्ती कुर्क केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. ED ने 121 एकर जमीन आणि ग्लोकल विद्यापीठाची इमारत जप्त केली आहे. ही संपत्ती अब्दुल वहिद एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर नोंद असून यावर मोहम्मद इक्बाल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नियंत्रण होते.

मोहम्मद इक्बाल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अब्दुल वहिद एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टवर करण्यात आलेली कारवाई अवैध खाणकाम प्रकरणात आहे. सध्या माजी आमदार मोहम्मद इक्बाल फरार असून तो दुबईत असल्याचा कयास ED ने वर्तवला आहे. मोहम्मद इक्बाल याला 4 मुळे असून त्यांच्यासह त्यांच्या भावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते सध्या तुरुंगाची हवा खात आहेत.