रिक्षाचालकाची मुलगी थायलंडच्या स्वारीवर

>>विठ्ठल देवकाते

मृणाल आगरकर ही एका रिक्षाचालकाची मुलगी 15 व्या युवा आशियाई मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी (18 वर्षांखालील) थायलंडच्या स्वारीवर रवाना झाली. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत अनेक अडथळय़ांच्या शर्यतीचा सामना करून मृणालने शालेय स्पर्धेपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंतचा प्रवास केलाय. हिंदुस्थानच्या 18 वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघात निवड झालेली मृणाल ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे, हे विशेष. 16 ते 23 जूनदरम्यान नाखोम पाथोम (थायलंड) येथे रंगणाऱया स्पर्धेत हिंदुस्थानी संघ आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाला आहे.

पुण्यातील मंगळवार पेठेत राहणारी मृणाल आगरकर ही मैदानावर अपघातानेच आली. फडके हौद येथील डॉ. जी.जी. शाह हायस्कूलमध्ये सातवीत असताना एकदा तिने शाळेत दोन मुलांना मारलं. शिक्षकांकडे ही तक्रार गेली. तेथे बसलेले क्रीडा शिक्षक मयूर बागे यांनी मृणालमधील आक्रमकता हेरून तिला मैदानावर येण्याची शिक्षा केली. मग येथूनच मृणालच्या व्हॉलीबॉल खेळाचा प्रवास सुरू झाला. एम. एस. स्पोर्ट्स क्लबमध्ये तिच्या नियमित सरावाला सुरुवात झाली. जबरदस्त काऊंटर अटॅकच्या जोरावर मृणालने अनेक शालेय स्पर्धेत आपल्या शाळेला जेतीपदे जिंकून दिली. त्यानंतर तिने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय शालेय स्पर्धेत मृणाल आगरकरचा दबदबा बघायला मिळाला. गतवर्षी तिने ‘बेस्ट काऊंटर अटॅकर’ किताबही पटकाविला. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघाला उपविजेतेपद जिंकून देण्यात मृणालचे योगदान होते.

सात महिन्यांपूर्वीच हरपले पितृछत्र

मृणाल आगरकर हिचे वडील अमित यांनी सुरुवातीपासून लेकीला व्हॉलीबॉल खेळण्यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला होता. लेकीच्या व्हॉलीबॉलमधील यशाने ते हुरळून जायचे, मात्र सात महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने अमित आगरकर यांचे आकस्मितक निधन झाले. पितृछत्र अचानक हरपल्याने मृणाल डिप्रेशनमध्ये गेली होती. आई (स्नेहल) आणि प्रशिक्षकांनी तिला या नैराश्येतून बाहेर काढले. 30 एप्रिलला बंगळुरूमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी सराव शिबिरात मृणालने आपल्या जबरदस्त काऊंटर अटॅकरच्या जोरावर हिंदुस्थानी संघात आपले स्थान पक्के केले. आपल्या मुलीने देशाचे प्रतिनिधित्व करावे ही वडिलांची इच्छा होती. मृणालने वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले, पण तिचे हे यश बघण्यासाठी आज वडील