सुपर एटचे सहा संघ निश्चित झाले आहेत उर्वरित दोन संभाव्य संघांचीही नावे निश्चित झाल्यामुळे हिंदुस्थानचा सुपर एटमधून उपांत्य फेरीचा प्रवास अधिक सोपा झाला आहे. ‘क’ गटातून अफगाणिस्तानने सुपर एट गाठल्यामुळे हिंदुस्थानची पहिली लढत त्यांच्याविरुद्धच होणार आहे. तसेच ‘ड’ गटातून नेदरलॅण्ड्स आणि नेपाळ यांनाही सुपर एटची संधी असली तरी बांगलादेशची सुपर एटची शक्यता अधिक असल्यामुळे हिंदुस्थानची दुसरी लढत याच संघाविरुद्ध होईल, असे अंदाज वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे 27 जूनला गयानाला होणाऱया सामन्यात हिंदुस्थानच खेळण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.
साखळीतून सुपर एटमध्ये पोहोचणाऱया चार-चार संघांचे दोन गट पाडले असून ‘अ’ गटात हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश तर ‘ब’ गटात अमेरिका, स्कॉटलंड/इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे गटात एकमेकांशी भिडतील.
आतापर्यंत सुपर एटसाठी हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या सहा संघांनी आपले नाव निश्चित केले आहे. तसेच ‘अ’ गटातून अमेरिकेचे स्थानही निश्चित झाले आहे. ‘ब’ गटातून स्कॉटलंड की इंग्लंड याचा फैसला ऑस्ट्रेलिया करणार असल्यामुळे साऱयांचे लक्ष ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड लढतीकडे वेधले गेले आहे. त्याचप्रमाणे ‘ड’ गटात सध्या बांगलादेश दुसऱया स्थानावर असून ते नेपाळविरुद्धचा सामना जिंकून आपला सुपर एट प्रवेश निश्चित करतील. परिणामतः हिंदुस्थानचा उपांत्य सामना 27 जूनला आयोजित करण्यासाठी गयाना सज्ज आहे. हिंदुस्थानचे तिन्ही सुपर एट सामने रात्री 8 वाजताच खेळविले जाणार असून उपांत्य फेरी गाठल्यास गयानालाच तो सामना रंगणार आहे.