मोदी की गॅरंटी… एका महिन्यात महागाईची दुप्पट झेप; कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, भाज्यांचे भाव कडाडले

एका महिन्यात महागाईने दुप्पट झेप घेतली असून गेल्या 15 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले असून मध्यमवर्गीयांचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. शाकाहारापेक्षा मांसाहार स्वस्त असल्याचे चित्र आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत मांसाहारही महागणार असल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई एप्रिलमध्ये 1.26 टक्के इतकी होती. मे महिन्यात महागाई 2.61 टक्क्यांवर म्हणजेच दुप्पटीने वाढली. म्हणजेच महागाईने गेल्या 15 महिन्यांचा उच्चांक गाठला असून सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली. महागाईचा आगडोंब उसळल्याने सर्वसामान्य गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.

बटाटा सर्वाधिक कडाडला
2024मध्ये बटाटय़ाच्या किमती 64 टक्क्यांनी वाढल्या असून कांद्याचे दर 58 टक्क्यांनी वाढले आहेत. खाद्य पदार्थ, खाद्य पदार्थांची उत्पादने, कच्चे-पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढणे घाऊक किमती वाढण्याचे कारण आहे. मे 2023मध्ये घाऊक किंमत निर्देशांकाच्या दरात 3.48 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती.

कशामुळे वाढली महागाई?
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे माल खराब झाला तसेच बाजारातच माल कमी प्रमाणात पोहोचतोय. दुसरीकडे इंधनाचे दरही कडाडले आहेत. त्यामुळे आपोआपच भाजीपाल्यासह कडधान्यांचे भावही गगनाला भिडल्याचे मालाची ने-आण करणाऱयांनी सांगितले.

भाज्या 30 ते 40 रुपयांनी महाग
भाज्या तब्बल 30 ते 40 रुपयांनी कडाडल्याचे प्रभादेवीच्या भाजी मंडईचे भाजीविव्रेते रामचंद्र हिरवे यांनी सांगितले. 20 रुपये किलोने मिळणारा कोबी 60 रुपयांवर गेला आहे तर 80 ते 90 रुपये किलोने मिळणारा वाटाणा 120, 140 आणि 160 रुपये किलोवर गेला आहे. गवारीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. 60 ते 80 रुपये किलोने मिळणारी गवार दर्जानुसार 100, 120 आणि 160 रुपयांवर गेली आहे. 30 रुपये किलोने मिळणारा कांदा 40 रुपयांवर तर 25 रुपयांनी मिळणारा बटाटा 35 आणि 100 ते 120 रुपये किलोने मिळणारा लसूण 250 ते 300 रुपयांवर गेल्याचे हिरवे यांनी सांगितले.

‘अच्छे दिन’ कधी येणार?
अच्छे दिन आएंगे… मोदी की गॅरंटी… असे मोदी सरकार म्हणत आले आहे. पण ते ‘अच्छे दिन’ कधी येणार हे कुणीच सांगत नाही. उलट महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले आहेत.
– सुजाता येवले (गृहिणी, प्रभादेवी)

मेथी खायचीही सोय नाही
मेथीची जुडी घ्यायला गेले तर 60 रुपयांना एक जुडी मिळाली. कीती ही महागाई? सर्वसामान्यांनी खायचे काय आणि जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– कल्पना पंडीत (गृहिणी, प्रभादेवी)

भाजी    आधी आता (किलो)
फ्लॉवर   30 60
शेवगा    60 120
वाटाणा   80 120
गवार     60 100
ढोबळी मिरची 60 100
कारले   50 100
भेंडी     60 80
वांगी    30 60
कांदा   30 40
बटाटा  25 35
दुधी    40 80
कोबी   40 60
मेथी (जुडी)  20 60
कोथिंबीर  40 120
मिरची  100 140

किराणा आधी आता(किलो)
तूरडाळ 140 180
साखर 40 43
तांदूळ 80 90
मूगडाळ 95 105
चणा डाळ 80 90
गहू 35 45

खाद्यपदार्थ महागले
खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थांचा निर्देशांक 9.82 टक्के राहिला असून वर्षभरापूर्वी याच महिन्यातील हा दर 1.63 टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनीही गेल्याच आठवडय़ात एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर करताना या खाद्य पदार्थ्यांच्या किमतींबाबत चिंता व्यक्त केली होती.

मांसाहारही महागणार
ब्रॉयलर कोंबडी 180 रुपये किलो असून चिकन 280 रुपये किलो आहे तर गावठी कोंबडी 280 रुपये किलो आहे. तसेच मटण 720 रुपये किलो आहे. मात्र काही दिवसांत हे दरही वाढतील असे विव्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, अंडय़ांचे दर डझनामागे 68 रुपये होते हेच दर आता 75 रुपये आहेत.