लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. कांदा उत्पादक भागात महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे दिसले. कांदा उत्पादक शेतकऱयांमध्ये नाराजी होती. त्याची किंमत आम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोजावी लागली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात एका बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जळगाव, रावेरची जागा सोडली तर इतर सगळय़ा जागेवर फटका बसला. कांदा उत्पादक नाशिक, नगर, सोलापूर, पुणे जिह्यात आहेत. आम्ही दिल्लीत असताना पियूष गोयल, अमित शहा यांच्याबरोबर बोलताना लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला त्यामध्ये कांदा शेतकऱयांमध्ये नाराजी होती याविषयी सांगितले. उत्पादक आणि ग्राहक दोघांना परवडायला हवे. या दोघांमध्ये समन्वय हवा, अशी आमची मागणी होती. त्यांनी सगळ्यांनीदेखील गांभीर्याने घेतले असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याबद्दल विचारले असता भुजबळ यांनीच स्वतः सांगितले की, ते नाराज नाहीत. राज्यसभेचा उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने निश्चित केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.