औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? हा प्रश्न चामुंडी दुर्घटनेमुळे निर्माण होत आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होऊन अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. सतत या घटना घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
सतत होणारे हे अपघात मानवी चूक नसून पूर्णपणे सरकार आणि प्रशासन यामध्ये दोषी असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. नागपूर जवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज भेट दिली. या भेटीनंतर वडेट्टीवार बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि रामटेकचे खासदार श्यमकुमार बर्वे उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, अकुशल कामगारांच्या हाती 500 किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेतली न जाणे, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध न करून देता त्यांना काम करायला लावणे या बेजबाबदारपणाला कंपनी व्यवस्थापनासोबतच सरकारची प्रशासकीय व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे. स्फोट झाल्यानंतर जखमींना तत्काळ मदत मिळणे आवश्यक असताना दीड तासाने रुग्णवाहिका मदतीला पोहचते हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. यामुळे निष्पाप कामगारांचा जीव गेला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडे फक्त जाब मागून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने आणि प्रशासकीय यंत्रणेने यावेळी करू नये. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कुठे झोपी गेले याचे उत्तर सरकारने द्यावे.