>> रश्मी पाटकर
अनादी काळापासून माणसाला बुद्धीला आव्हान देणाऱ्या, अकल्पित आणि गूढ गोष्टींचं अनावर आकर्षण आहे. जे मानवी बुद्धीला कळत नाही, त्याला पुजण्याची किंवा त्यागण्याची वृत्ती त्यातून निर्माण झाली. त्यामुळे माणूस देवापुढे नतमस्तक झाला आणि आसुरी वृत्तींचं त्याला भय वाटू लागलं. काळाच्या ओघात या भयगंडाला बाहेर काढण्याचे अनेक मार्ग त्याने परंपरांच्या रुपात स्वीकारले. जे भीतीदायक आहे, त्यालाही सन्मान देऊन त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग त्याने शोधले. अशाच एका प्राचीन परंपरेचा आधार अल्याड पल्याड या चित्रपटाच्या कथेत घेण्यात आला आहे.
कोकणातील अनेक गावांमध्ये विविध परंपरा पाळल्या जातात. ग्रामस्थ अत्यंत श्रद्धेने त्या परंपरांचं पूजन करतात. अशीच एक परंपरा म्हणजे गावपळण. कोकणातल्या चिंदर आणि आजरे अशा गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते. या परंपरेचा आधार घेऊन अल्याड पल्याड या चित्रपटाची कथा सुरू होते. या कथेत एक रम्य गाव तीन दिवसांसाठी गावच्या वेशीबाहेर वस्ती करून राहतं. त्या दरम्यान या गावात भूत आणि मृतात्मे फिरतात अशी वदंता असते. त्यामुळे या तीन दिवसांत कुणीही गावात पाऊलही टाकायचं नाही, अशी सक्त ताकीद सर्वांना दिलेली असते. याच गावातला पण सध्या शहरात शिकायला गेलेला पंक्या नावाचा तरुण त्याच्या दोन मित्रांसह या परंपरेच्या निमित्ताने मजा करण्यासाठी गावात येतो. ही परंपरा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे, असं म्हणत यातला एक जण पुन्हा गावात दाखल होण्याचं ठरवतो. ते तिघे एका नावाड्याला भरीला पाडून पुन्हा नदीतून गावात पाऊल टाकतात. तेव्हापासून सुरू होतो भीतीचा खेळ. तो काय असतो. या गावात नेमकं काय गूढ लपलेलं असतं आणि ते शोधायला गेलेल्या या तीन जणांना काय किंमत चुकवावी लागते, हे मात्र चित्रपटातच पाहावं लागेल.
चित्रपटाची संहिता चांगली असली तरी पटकथेत फारसा दम नाही. विशेषतः मध्यंतरापूर्वी पटकथा प्रचंड रेंगाळते. अनेक गोष्टींचे दुवे कच्चे राहिले आहेत. त्यामुळे गूढ आणि भीती मनात ठसत नाही. मध्यंतरानंतर मात्र कथेने वेग घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यात रमतो. तरीही पुरेशी भीती वाटत नाही. तीच बाब संवादांची. गाव कोकणात आणि बोली मात्र पश्चिम महाराष्ट्राची असल्याने ते सतत कानाला खटकत राहतात. भय आणि विनोद यांची सांगड घालण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलेले नाहीत. विशेषतः प्रासंगिक विनोद रंगत आणत नाहीत. अभिनयातही पुरेसा दम नाही. गौरव मोरे आणि सक्षम कुलकर्णी यांनी थोडी मजा आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुळातच त्यांची पात्रं रंगवलेली नसल्याने त्यांनाही मर्यादा आल्या आहेत. यातील तांत्रिक बाजू मात्र उजवी आहे. ड्रोनमधून घेतलेली विहंगम दृश्यं कोकणाचा देखणा निसर्ग दाखवतात. तर दुसरं म्हणजे मध्यंतरानंतरच्या कथेत वापरलेले ग्राफिक्सही चांगले झाले आहेत. गाणी मात्र फारशी ठसत नाहीत.
थोडक्यात, भीती किंवा विनोद यातील काहीही मनावर ठसत नाही. त्यामुळे प्रेक्षक कथेच्या काठावरच राहतो. कच्ची पटकथा आणि संवादांचा अभाव यांमुळे मांडणीत फसलेला रंजक भयपट असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल.