अण्णांना जेव्हा अधूनमधून जाग येते! अजित पवार यांच्या ‘क्लीन चिट’ला आक्षेप

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जागे झाले आहेत. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळय़ात पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी गुरुवारी सत्र न्यायालयात आक्षेप घेतला. तसेच निषेध याचिका दाखल करण्यास वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने वेळ दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार लटकण्याची चिन्हे आहेत. अजित पवार सत्तेत गेले आणि शिखर बँक घोटाळय़ाच्या तपासाची उलटी चव्रे फिरली व फाईल बंद करण्यात आली.

– याप्रकरणी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी हजारे व जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यास न्यायालयाकडे वेळ मागितला. त्याच अनुषंगाने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करीत न्यायालयाने 29 जूनला पुढील सुनावणी निश्चित केली. त्यामुळे अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचीही चिंता वाढली आहे.

– लोकसभा निवडणूक संपताच एकीकडे एसीबीने जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळय़ाचा तपास सुरू केला आहे. याचदरम्यान ईओडब्ल्यूने दाखल केलेला अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट लटकण्याची चिन्हे आहेत. ईडीनेसुद्धा या अहवालावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अजित पवार कात्रीत सापडले आहेत.