एटीएममधून रोकड काढणं आता महागणार, इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी

एटीएममधून वारंवार पैसे काढणाऱया ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बँका लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हा निर्णय इंटरचेंज फी वाढीसंदर्भातील असून त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर बसेल आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी जादा शुल्क मोजावे लागेल.

देशातील एटीएम ऑपरेटर्सनी आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्याकडे इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली आहे. इंटरचेंज फी म्हणजे ग्राहकांकडून रोख रक्कम काढण्यावर घेण्यात येणारे शुल्क.  इंटरचेंज फी वाढल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागेल.

एटीएम उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, इंटरचेंजमध्ये वाढ हा एनपीसीआयने घेतलेला निर्णय आहे. मागील दोन वर्षांपूर्नी झालेल्या वाढीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयने याबाबत अद्याप काही माहिती दिलेली नाही. देशात डिजिटल व्यवहारांत वाढ झालेली असली तरी रोखीचे व्यवहारही तेवढय़ाच प्रमाणात होतात. रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम हा पर्याय निवडला जातो. मात्र तोही आता महाग होण्याची चिन्हे आहेत. कारण इंटरचेंज शुल्क वाढल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

n तुम्ही तुमच्या बँकेचे एटीएम वापरले तर तुम्हाला पैसे काढण्यासाठी मर्यादित व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क
आकारले जाणार नाही. दुसऱया बँकेचे एटीएम वापरल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते.

n काहीवेळा तुमची बँक इतर बँकांशी भागीदारी करते. अशा स्थितीत, तुम्ही सहभागी बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकता. वीज किंवा इतर बिले भरण्यासाठी पैसे काढण्याऐवजी शक्यतो ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करा.

किती शुल्क वाढेल…

एटीएम ऑपरेटर्सची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री’ने इंटरचेंज फी प्रति व्यवहार जास्तीत जास्त 23 रुपये वाढवावे अशी मागणी केली आहे. त्याच वेळी, एटीएम उत्पादक ‘एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज’ने प्रति व्यवहार 21 रुपयांपर्यत इंटरचेंज फी वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. 2021 मध्ये इंटरचेंज फी वाढवण्यात आली होती आणि 15 रुपयांवरून प्रति व्यवहार 17 रुपये करण्यात आली होती. त्याला दोन वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. त्यामुळे  आता पुन्हा एकदा बदल करण्याची गरज असल्याचा ऑपरेटर्सचे मत आहे.

आरबीआयशी बोलणी…

अद्याप आरबीआयने याबाबत अधिकृतपणे काही सांगितलेले नाही. एटीएम उत्पादक कंपनी ‘एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज’चे कार्यकारी अध्यक्ष स्टॅनली जॉन्सन यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी इंटरचेंज फी वाढवण्यात आली होती. आम्ही आरबीआयशी संपर्क साधत आहोत आणि त्यांनी दरवाढीला परवानगी दिली आहे.

इंटरचेंज फी म्हणजे…  

इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱया बँकेला दिली जाते. समजा तुमच्याकडे एका विशिष्ट बँकेचे डेबिट कार्ड आहे. पण पैसे काढताना तुम्ही दुसऱया बँकेच्या एटीएम मशीनचा वापर केला. अशा वेळी ज्या बँकेचे डेबिट कार्ड आहे, ती बँक दुसऱया बँकेला इंटरचेंज फी देते.

n सध्या देशभरातील सहा मेट्रो शहरे- बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील बँका बचत खातेधारकांना एका महिन्यात किमान पाच विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देतात, तर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये तीन व्यवहार विनामूल्य करण्याची मुभा आहे.