साऊथमध्ये तुफान अॅक्शन सिक्वेन्स, दमदार कथानक असलेले चित्रपट असतात. हाच अनुभव प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट सांगणाऱ्या “रांगडा” या चित्रपटातून मिळणार आहे. “रांगडा” चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट 5 जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे, अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
महाराष्ट्राची ओळख असलेल्या कुस्ती आणि बैलगाडा शर्यत या दोन गोष्टींवर आधारित एक धमाकेदार कथानक “रांगडा” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे चित्रपटाचं कथासूत्र आहे. त्याशिवाय त्याला प्रेमकथेचाही पदर आहे. म्हणूनच बैलगाडी हाकत येणाऱ्या सुंदर तरुणीपासून सुरू होणाऱ्या टीजरमधून कुस्ती, बैलगाडा शर्यत, आखाडा, राजकारण, तुफान अॅक्शनचं दर्शन घडतं. त्यामुळे आता रांगडा हा चित्रपट नावाप्रमाणेच रांगडा असणार याची खात्री टीजरने पटवून दिली आहे.