ऑनलाईन मागवलेल्या आइस्क्रीम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, मुंबईतील खळबळजनक प्रकार

पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबईमध्ये अद्यापही तापमानात जास्त घट झालेली नाही. त्यामुळे अशा या दमट-उष्ण वातावरणात तुम्ही ऑनलाईन आइस्क्रीम मागवण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण मुंबईमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. मालाडमध्ये ही घटना घडली आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या आर्लेम ब्रँडन सेराओ (वय – 27) या महिलेने युम्मो आइस्क्रीम कंपनीचे आइस्क्रीम कोन ऑनलाईन ऑर्डर केले होते. कोनचे रॅपर काढून आइस्क्रीमचा आनंद लुटत असताना तिच्या जिभेला काहीतरी टणक वस्तू लागली. तिने ती बाहेर काढून पाहिली असता तिला धक्काच बसला. आइस्क्रीम कोनमध्ये तिला मानवी बोटाचा तुकडा सापडला असून याची माहिती तिने मलाड पोलिसांना दिली. पोलिसांनी आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेले मानवी बोट फॉरेन्सिक टीमकडे तपासणीसाठी पाठवले आहे.

सदर महिलेने ऑनलाईन डिलिव्हरी अॅपद्वारे बटरस्कॉच फ्लेव्हरचे आइस्क्री कोन ऑर्डर केले होते. निम्म्याहून अधिक आइस्क्रीम खाल्ल्यानंतर तिला त्यात मानवी बोटाचा तुकडा आढळला. हा तुकडा जवळपास 2 सेंटीमीटर लांबीचा आहे. आर्लेम ब्रँडन सेराओ ही एमबीबीएस डॉक्टर असल्याने तिने पहिल्या नजरतेच तो मानवी बोटाचा तुकडा असल्याचे ओळखले. तिने लागलीच मालाड पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेला बोटाचा तुकडा फॉरेन्सिक पथकाकडे तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच ज्या ठिकाणी हे आइस्क्रीम बनले आणि जिथून पॅक केले गेले त्या ठिकाणाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आइस्क्रीम उत्पादक कंपनीला फोन कॉल आणि इमेल पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.